सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या दिशेने जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
जिल्ह्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे स्मार्ट रूपांतरण करण्याचा संकल्प राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी केला आहे.
*कोणती ११ केंद्रे होणार स्मार्ट ?*
1. मार्डी – उत्तर सोलापूर
2. भंडारकवठे – दक्षिण सोलापूर
3. पानगाव – बार्शी
4. चपळगाव – अक्कलकोट
5. पाटकूल – मोहोळ
6. मोडनिंब – माढा
7. केम – करमाळा
8. खर्डी – पंढरपूर
9. आंधळगाव – मंगळवेढा
10. मोरोची – माळशिरस
11. नाझरा – सांगोला
या ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्मार्ट रूपांतरणाचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, सभापती रामाप्पा चिवडशेट्टी, सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
*काय होणार बदल ?*
या आरोग्य केंद्रांमध्ये मॉड्युलर शस्त्रक्रियागृह, मॉड्युलर प्रसूतीगृह, पाणीपुरवठा व्यवस्था तसेच स्वच्छतागृहांची दुरुस्ती व आवश्यक सुविधांचे आधुनिकीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक स्तरावरच दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी आणि आरोग्य केंद्रांचा कायापालट व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
केवळ इमारतींचा विकास नव्हे, तर आरोग्य सेवेच्या गुणवत्तेत परिवर्तन घडवून ग्रामीण जनतेला आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा संकल्प आहे.
आरोग्य सेवेला आधुनिकतेची जोड देत, ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्यासाठी सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या पुढाकारातून सोलापूर जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहे.




