सोलापूर : जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या कक्षासमोर लागलेल्या रांगेमध्ये कडेवर मूल घेऊन एक आई उभी होती. शिक्षण सभापतीकडील बैठक आटोपून माध्यमिक शिक्षणाधिकारी *सचिन जगताप* हे आपल्या कक्षामध्ये जात असतानाच त्यांना हे दृश्य दिसले. त्यांनी तात्काळ त्या मातेला कक्षात बोलवून कामाबाबत विचारणा केली आणि काही मिनिटातच तिचे काम हातावेगळे केले. शिक्षणाधिकारी जगताप यांच्या समयसूचकतेचे उपस्थितांमधून कौतुक होत आहे.
ही माता आपल्या बारावीच्या बोर्ड प्रमाणपत्रावरील आडनावाच्या दुरुस्तीसाठी आली होती.
*पत्रात नेमकं काय ?*
याबाबत श्री सिद्धेश्वर आर्ट्स, सायन्स व कॉमर्स ज्युनिअर कॉलेज, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर यांनी दि. १८/११/२०२६ रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांना पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, या शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २००७ मध्ये बसून उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी *कु. पल्लवी दत्तात्रय चाटला* हिच्या इ. १२ वी चे बोर्ड परीक्षेचे आवेदन पत्र भरताना नजरचुकीने आडनावाच्या स्पेलिंगमध्ये *Chatala* अशी पडलेली आहे.
परंतु कॉलेजच्या आणि शाळेच्या रेकॉर्डनुसार जनरल रजिस्टरवर सदर विद्यार्थिनीची अडनावाचे स्पेलिंग *Chatla* अशी आहे, ती बरोबर व सत्य आहे.सदर विद्यार्थिनीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर आणि गुणपत्रिकेवर अडनावाच्या स्पेलिंगमध्ये दुरुस्त होऊन मिळण्याकरिता विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करीत आहे. तरी सदर प्रस्ताव स्विकारून अडनावाच्या स्पेलिंगमध्ये दुरुस्ती होण्याकरीता शिफारसपत्र मिळावे आणि विहित नमुनापत्रावर प्रतिस्वाक्षरी होऊन मिळावी, अशी नम्र विनंती प्राचार्यांनी केली आहे.
या पत्राची प्रत विभागीय संचालक, पुणे शिक्षण मंडळ, पुणे आणि विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, पुणे यांना देण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी जगताप यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून शिफारस व प्रतिस्वाक्षरीची प्रक्रिया मार्गी लावल्याने त्या मातेला दिलासा मिळाला.



