सोलापूर : पूर्व भागातील दाजी पेठ येथील श्री वेंकटेश्वर देवस्थानात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या ५४ व्या ब्रह्मोत्सवाचा रविवारी (दि. २२) धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात समारोप झाला. शेवटच्या दिवशी सूर्यप्रभा व चंद्रप्रभा वाहनसेवा, चक्रस्नानम्, वसंतोत्सवम् (वनविहार) आणि ध्वजपट अवरोहणम् आदी धार्मिक विधी पार पडले.
या देवस्थानात मंगळवार (दि. १७ नोव्हेंबर) पासून ब्रह्मोत्सवाला सुरुवात झाली होती. तिरुमला तिरुपती देवस्थानच्या धार्मिक परंपरेनुसार येथे दरवर्षी ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. यंदा या उत्सवाचे ५४ वे वर्ष होते.
रविवारी सकाळी ७.३० वाजता होमहवन आणि सूर्यप्रभा वाहनसेवा पार पडली. त्यानंतर सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत चक्रस्नानम् (चक्रतीर्थ), आराधना, शात्तुमुरै आणि तीर्थप्रसाद आदी धार्मिक विधी करण्यात आले. यावेळी श्रीदेवी, भूदेवीसमेत श्री वेंकटेश्वर स्वामी आणि सुदर्शन चक्र यांना तेल, हळद व अन्य पूजासाहित्याने अभिषेक करण्यात आला.
सूर्यप्रभा वाहनसेवा भगवान विष्णूच्या सूर्यस्वरूपाचे प्रतीक मानली जाते. सूर्याच्या तेजाप्रमाणे भक्तांना वैभव आणि ऊर्जेची अनुभूती देणारी ही सेवा आहे. तर चंद्रप्रभा वाहनसेवेतून भगवानाचे चंद्राप्रमाणे शीतल, प्रसन्न आणि शांत स्वरूप भाविकांना अनुभवता येते.
सायंकाळी ५ ते ९ या वेळेत आराधना, चंद्रप्रभा वाहनसेवा, होमहवन, महापूर्णाहुती, श्री पुष्पयागम्, हंसवाहनम् आणि वसंतोत्सवम् (वनविहार) आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच शोभेच्या दारुकामाची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर ध्वजपट अवरोहणम्, शात्तुमुरै आणि कुंभप्रोक्षणम् हे विधी संपन्न झाले.
अशा प्रकारे विविध धार्मिक विधी, पारंपरिक वाहनसेवा आणि भक्तिमय वातावरणात श्री वेंकटेश्वर देवस्थानच्या सहा दिवसीय ब्रह्मोत्सवाची सांगता झाली. या उत्सवामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.




