आकुलवार, गिरीश पुकाळे यांची चौकशी; नगरसेवक अनंत जाधव यांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची कार्यवाही
सोलापूर : प्रतिनिधी
महापालिकेच्या नालेसफाई कामातील कथित अनियमिततेप्रकरणी उपअभियंता सारिका आकुलवार आणि वरिष्ठ फोरमन गिरीश पुकाळे यांची शुक्रवारपासून विभागीय चौकशी सुरू झाली आहे. सेवानिवृत्त उपसचिव सदाशिव बेनके यांची चौकशी अधिकारी, तर उपअभियंता विजय लोखंडे यांची सादरकर्ता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही कार्यवाही सुरू झाली आहे.
महापालिका सभागृहात तसेच निवेदनांद्वारे नगरसेवक जाधव यांनी या प्रकरणात संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. महापालिका आयुक्तांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने यापूर्वीच तत्कालीन नगर अभियंता सारिका आकुलवार, गिरीश पुकाळे, कंत्राटदार रंजित टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यासह एकूण १९ जणांवर ठपका ठेवला होता. चौकशी अहवाल ३० दिवसांत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. मात्र, पुढील चौकशीची कार्यवाही रखडली होती.
या विलंबाबाबत नगरसेवक अनंत जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली होती. शहरातील तिन्ही आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करूनही चौकशी का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. वेळप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्यासह आयुक्त हटावचा ठराव आणण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
दरम्यान, गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जाधव यांनी पुन्हा कडक भूमिका मांडल्यानंतर प्रशासनातील हालचालींना वेग आला. अखेर शुक्रवारी चौकशी अधिकारी सदाशिव बेनके यांनी सोलापुरात येऊन चौकशीला सुरुवात केली. त्यांनी सुमारे चार तास संबंधित प्रकरणाची चौकशी केली.
आता या विभागीय चौकशीतून काय निष्पन्न होते आणि चौकशी अहवालात कोणती बाब समोर येते, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Solapur Municipal Corporation, Solapur







