मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट; औषधसाठा, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांची केली पाहणी
#पंढरपूर : ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेत, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असून, यासाठी आरोग्य यंत्रणेने तत्परतेने काम करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले.
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी कुशल जैन यांनी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा, औषधसाठा, स्वच्छता, रुग्णांसाठी उपलब्ध सुविधा, केंद्रातील एकूण व्यवस्था आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची माहिती घेतली.
ग्रामीण भागातील नागरिकांना उपचारासाठी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये. आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वेळेत आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने काम करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी गटविकास अधिकारी अमोल जाधव, कक्ष अधिकारी शहाजान तांबोळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बोधले, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.







