सोलापूर : विभागीय आयुक्तांची दिशाभूल करून मुख्यालय औषध भंडाराचा अनुभव नसताना व सेवा जेष्ठता यादी डावलून नियुक्ती मिळवलेल्या मुख्य औषध भंडारातील फार्मशिष्ट लीना पुजारी यांच्या चौकशी अहवालावर कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात दिले. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झेडपी अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत करकंब गटाचे झेडपी सदस्य आदिनाथ देशमुख यांनी लक्षवेधी केली. दुष्काळी परिस्थितीत सर्व समित्यांचे अधिकार अध्यक्ष दीपक वैद्य यांना द्यावेत. तसेच फार्मासिस्ट लीना पुजारी यांच्या चौकशी अहवालाचे काय झाले? असा सवाल उपस्थित केला
त्यावर सीईओ कुशल जैन यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपूरवाड यांना चौकशी अहवालाबाबत उत्तर देण्यास सांगितले. डॉ. कोपूरवाड यांनी चौकशी अहवाल तयार असून तात्काळ सादर करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यावर सीईओ जैन यांनी फार्मासिस्ट पुजारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सभागृहाला उत्तर दिले.



