सोलापूर झेडपीत पंधराव्या वित्त आयोग निधी वाटपाचा वाद
सोलापूर : सोलापूर झेडपीत पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाचा वाद विकोपाला गेला आहे. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांना 90 तर विरोधी सदस्यांना 45 लाख निधी वाटपाचे धोरण अवलंबल्याने शिंदे शिवसेना गटाच्या सदस्यांनी याला शुक्रवारच्या झेडपी सर्वसाधारण सभेत आक्षेप घेतला. शिवराज मेत्रे, प्रवीण तानवडे यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वाटपाचे काय झाले असा सवाल उपस्थित केला. त्यावर उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी निधी वाटपाला मंजुरी मिळाल्या असून सोमवारी निधी वाटप होईल असे सांगितले. त्यावर या सदस्यांचे समाधान झाले नाही आम्हाला अध्यक्षांकडून उत्तर हवे आहे असा प्रतिसावाल केला. त्यावर अध्यक्ष दीपक वैद्य यांनीही सर्वांना निधी मिळेल असे सांगितले. त्यावर पुन्हा या सदस्यांनी कोणा कोणाला किती निधी व निधी वाटपाचे नियोजन कसे ठरले यावर स्पष्टीकरण मागितले. अध्यक्षांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने शिंदे गटाच्या सदस्यांनी आम्ही शेती विकून मतदार संघाचा विकास करू तुमचा निधी तुमच्या जवळच ठेवा असे म्हणत सभात्याग केला.
जिल्हा परिषदेच्या सभेत सुरुवातीपासूनच अध्यक्ष दीपक वैद्य यांनी आक्रमक भूमिका घेतली. रील स्टार व सदस्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. सीईओ कुशल जैन यांनी याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती, धोकादायक शाळांच्या इमारत दुरुस्ती वरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मागील सभेच्या इतिवृत्तांतून सदस्यांनी मांडलेले मुद्दे वगळल्याने यावर रणकंदन झाले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी समयसूचकता दाखवीत वेळीच सावरती भूमिका घेत सभागृहाचे वातावरण शांत केले. दुपारी दोन वाजता सुरू झालेली सभा सायंकाळी सात वाजता संपली. यात सदस्यांनी दुष्काळी परिस्थितीत पाणी व चारा टंचाईच्या मुद्द्यावर लक्षवेधी केली. आरोग्य व शिक्षण विभागाच्या प्रश्नावर आधिकार्यांना धारेवर धरले.



