पंढरपूरच्या ६५ एकर परिसरात १६,४३३ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी; १०,३२८ वारकऱ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप
पंढरपूर / सोलापूर, दि. २३ नोव्हेंबर २०२६ : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कार्तिकी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथील ६५ एकर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दि. २० ते २३ नोव्हेंबर २०२६ या चार दिवसांच्या कालावधीत तब्बल १६,४३३ वारकऱ्यांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर १०,३२८ वारकऱ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागाने वारीतील आरोग्यसेवेचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
हे महाआरोग्य शिबिर उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. आरोग्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) डॉ. अमोल भोर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे व त्यांची टीम तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड व त्यांच्या टीमने शिबिराच्या नियोजनाची व अंमलबजावणीची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली.
कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर येथे राज्याच्या विविध भागांतून लाखो भाविक व वारकरी दाखल झाले होते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने एकाच ठिकाणी विविध वैद्यकीय सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, औषधोपचार आणि आवश्यक आरोग्य सल्ला उपलब्ध करून दिला.
शिबिरातील आरोग्य सेवांचा तपशील
चार दिवसांच्या कालावधीत विविध विभागांमार्फत पुढीलप्रमाणे आरोग्य सेवा देण्यात आल्या.
– नेत्र तपासणी – २,६५३
– मोफत चष्मे वाटप – १०,३२८
– जनरल ओपीडी – ७९९
– आयुष विभाग – ६९३
– मोतीबिंदू तपासणी – ६०५
– दंत तपासणी – ५७८
– एनसीडी स्क्रीनिंग – २२७
– आयसीटीसी तपासणी – १७९
– स्त्रीरोग तपासणी – १७३
– अस्थिरोग तपासणी – ११०
– एक्स-रे तपासणी – ७७
– शस्त्रक्रिया विषयक सल्ला – ११
वारीच्या सेवेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
वारीच्या कालावधीत भाविकांना तातडीची आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आरोग्य विभागाने व्यापक व्यवस्था केली होती.
– ट्रॉमा व आयसीयू सेंटर – ५ ठिकाणी
– प्राथमिक आरोग्य तपासणी व औषधोपचार केंद्रे – १५ ठिकाणी
– १०८ रुग्णवाहिका – ६
– १०२ आरोग्य सेवा रुग्णवाहिका ६
– आरोग्यदूत – ३३
या व्यवस्थेमुळे भाविकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे शक्य झाले.
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमातून शिबिर यशस्वी
महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, विविध विभागांचे समन्वयक, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आशा स्वयंसेविका, सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून आणि सामूहिक प्रयत्नांतून हजारो वारकऱ्यांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे शक्य झाले. वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य देत आरोग्य विभागाने राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे.
‘वारी विठुरायाची, काळजी आपल्या आरोग्याची’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकारत सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली. आगामी वारी व धार्मिक यात्रांमध्येही अशाच प्रकारे व्यापक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे.






