शिवाजी विद्यापीठ उपविजेते; सोलापूर विद्यापीठाला चौथा क्रमांक
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठ संघ (एआययू) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पश्चिम विभागीय पुरुष लॉन टेनिस स्पर्धा २०२६-२७ चा समारोप बुधवारी उत्साहात झाला. या स्पर्धेत मणिपाल विद्यापीठ, जयपूरच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. शिवाजी विद्यापीठाने द्वितीय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तृतीय, तर यजमान सोलापूर विद्यापीठाने चौथा क्रमांक मिळविला.
विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा होते. यावेळी स्पर्धेचे आयोजन सचिव तथा प्रभारी कुलसचिव आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. अतुल लकडे, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सहसचिव राजीव देसाई, स्पर्धा निरीक्षक तथा चाणक्य विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. हेमंत एन. व्ही. यांच्यासह विद्यापीठाचे सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिकारी, प्राध्यापक, प्रशिक्षक, पंच आणि खेळाडू उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. अतुल लकडे यांनी स्पर्धेच्या आयोजनाची माहिती दिली. गेल्या चार दिवसांत विविध विद्यापीठांच्या संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. खेळाडूंनी कौशल्य, मेहनत, शिस्त आणि क्रीडाभावनेच्या जोरावर स्पर्धेत चुरस निर्माण केली, असे त्यांनी सांगितले.
स्पर्धा निरीक्षक डॉ. हेमंत एन. व्ही. यांनी स्पर्धेतील सामने, खेळाडूंची कामगिरी आणि आयोजनाबाबतचा अनुभव व्यक्त केला. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठ प्रशासन, आयोजन समिती, क्रीडा विभाग, पंच, प्रशिक्षक आणि स्वयंसेवकांनी घेतलेल्या परिश्रमांचे त्यांनी कौतुक केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिके आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. मणिपाल विद्यापीठ, जयपूरने विजेतेपदावर नाव कोरले, तर शिवाजी विद्यापीठाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. लक्ष्मीकांत दामा यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. विजय-पराजयाचा विचार न करता खेळभावना, सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर खेळाडूंनी आपल्या पुढील क्रीडा कारकिर्दीत यश संपादन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ. अभिजित जगताप, डॉ. समर्थ मनुकर, डॉ. दत्तात्रय बिराजदार, मकरंद भुजबळ, जोशना मदने, तेजल कुलकर्णी आणि अजितकुमार संगवे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. भास्के अंबादास यांनी केले, तर प्रा. बाळासाहेब वाघचवरे यांनी आभार मानले






