“मी स्वतः एका रेशन दुकानदाराचा मुलगा आहे आणि हे सांगण्यास मला कधीही लाज वाटत नाही. रेशन दुकानदारांच्या सर्व अडचणी आणि समस्या मला माहिती आहेत. येणाऱ्या काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून रेशन दुकानदारांसाठी एखादी चांगली योजना आणण्याचा माझा प्रयत्न राहील,” असे भावनिक वक्तव्य पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे सचिव नितीन पेंटर, सोलापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप पतंगे आणि सोलापूर लेबर फेडरेशनचे चेअरमन शंकर चौगुले यांनी सहकार पॅनलला पाठिंबा जाहीर केला.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, लोकमंगल मल्टीस्टेटचे रोहन देशमुख, दिलीप पतंगे, राजकुमार हंचाटे, नगरसेवक अजय पोन्नम, अक्षय अंजीखाने यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
रेशन दुकानदारांच्या प्रश्नांबाबत बोलताना पालकमंत्री गोरे यांनी आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा उल्लेख केला. रेशन दुकानदारांच्या अडचणींची आपल्याला जवळून माहिती असून, त्यांच्या हितासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून योजना आणण्याचा शब्द त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.
या बैठकीला रास्त भाव धान्य दुकानदार संघटना, पतसंस्था आणि विविध फेडरेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनी सहकार पॅनलला पाठिंबा जाहीर केला.






