*शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांचे आश्वासन*
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी अधिकाराचा गैरवापर करून २१ शिक्षकांच्या प्रतिनिधी नियुक्त्या केल्याचा गंभीर आरोप मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अक्कलकोट शाखाध्यक्ष महांतेश्वर हणमंतराव कट्टीमनी यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन अहवाल सादर करण्यात आला असतानाही पाहुनपणाचा फायदा घेत संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याची तक्रार शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावर शिक्षण सभापती केदार यांनी झेडपीत कोण कोणाचा पाहुणा नाही. प्रशासकीय कारभारात चुका करणाऱ्यांवर कारवाई होणारच. अक्कलकोटचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांच्याविरुद्ध गंभीर तक्रारी आल्या असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कट्टीमनी यांनी अक्कलकोटच्या गटशिक्षणाधिकाऱ्याच्या कारभाराबाबत सभापती केदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकोट तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांनी अधिकार नसताना ऑगस्ट २०२४ मध्ये २१ शिक्षकांच्या प्रतिनिधी नियुक्त्या केल्या. विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अधिकारांचा वापर करून या नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकाराविरोधात सप्टेंबर २०२४ मध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. या समितीने २७ डिसेंबर २०२४ रोजी चौकशी केली आणि १६ जानेवारी २०२५ रोजी चौकशी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला. मात्र, अहवाल सादर होऊनही कारवाईस विलंब होत असल्याने तक्रारदाराने अनेक वेळा आंदोलन, आमरण उपोषण व धरणे आंदोलनाचा मार्ग अवलंबला.
दरम्यान, माहितीच्या अधिकारांतर्गत चौकशी अहवालावरील कारवाईची माहिती आणि संबंधित कागदपत्रांची मागणी करण्यात आली. त्यावेळी संबंधित कार्यालयाकडून फाईल ऑनलाइन व ऑफलाइन सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, शिक्षण विभागाच्या संबंधित कार्यालयात सदर फाईल प्राप्त झाल्याची नोंद आढळून येत नसल्याचे निदर्शनास आले. वारंवार विचारणा करूनही फाईल प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात येत असल्याने या प्रकरणातील प्रशासकीय कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संबंधित फाईल गहाळ झाल्याचा संशय व्यक्त करताना, फाईलच्या हाताळणीत व कामकाजात अनियमितता झाल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी शिक्षण समितीचे सभापती केदार यांच्याकडे केली आहे. त्यावर सभापती केदार यांनी गटशिक्षणाधिकारी अरबळे यांची चौकशी पूर्ण झाली असून लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले



