मानेगाव ते खैराव आणि मानेगाव ते वाकाव या मार्गाने पाइपलाइन टाकण्याच्या प्रस्तावाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू
सोलापूर : प्रतिनिधी
मानेगाव व परिसरातील गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. सीना नदीतून मानेगावला पाणी आणण्यासाठी प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेच्या पाइपलाइन मार्गाचे संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू केले आहे. आमदार अभिजीत पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या कामाला सुरुवात झाल्याने मानेगावकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मानेगाव दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांनी मांडलेल्या पाणीप्रश्नाची आमदार अभिजीत आबा पाटील यांनी गंभीर दखल घेतली होती. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी त्यांनी संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते. तसेच दूरध्वनीवरूनही अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
मानेगाव ते खैराव तसेच मानेगाव ते वाकाव या मार्गाने सीना नदीतून पाणी आणण्यासाठी पाइपलाइन टाकून पाणीपुरवठा योजना राबविण्याचा प्रस्ताव त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडला होता. त्यानुसार योजनेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले होते.
या पाठपुराव्याची दखल घेत संबंधित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी आज मानेगाव येथे भेट देऊन प्रस्तावित पाइपलाइन मार्गाची पाहणी केली. तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे मानेगावच्या पाणीप्रश्नावर केवळ चर्चेपुरत्या मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
सर्वेक्षणानंतर योजनेचा प्रस्ताव, तांत्रिक बाबी आणि पुढील प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया पार पडणे अपेक्षित आहे. ही योजना प्रत्यक्षात साकारल्यास मानेगाव व परिसरातील गावांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघण्यास मदत होऊ शकते. ग्रामस्थांना नियमित पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी आमदार अभिजीत पाटील यांचा पाठपुरावा सुरू आहे
