महात्मा बसवेश्वर शासकीय आयटीआयचा पाचवा कौशल्य दीक्षांत समारंभ उत्साहात
सोलापूर : प्रतिनिधी
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थी हे औद्योगिक विकासाचे खरे आधारस्तंभ असून, हीच देशाची खरी संपत्ती आहे. आजच्या स्पर्धात्मक आणि तंत्रज्ञानप्रधान युगात तरुणांना पारंपरिक पदव्यांपेक्षा प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि तांत्रिक कौशल्यांची अधिक गरज आहे, असे प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले.
विजापूर रोडवरील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), सोलापूर यांच्या वतीने आयोजित पाचव्या कौशल्य दीक्षांत समारंभात त्या बोलत होत्या. शुक्रवारी झालेल्या या कार्यक्रमात यशस्वी प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला.
खासदार शिंदे म्हणाल्या की, आयटीआयसारख्या संस्थांमधून मिळणारे तांत्रिक प्रशिक्षण तरुणांना रोजगारक्षम बनविण्यासोबतच स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होण्यासाठी भक्कम पाया उपलब्ध करून देते. आयटी पार्कच्या बरोबरीनेच नव्हे, तर त्यापेक्षाही अधिक रोजगारनिर्मितीची क्षमता असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या विकास आणि आधुनिकीकरणावर शासनाने विशेष भर देण्याची आवश्यकता आहे. बदलत्या औद्योगिक गरजांनुसार कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य दिल्यास तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले यांनी यशस्वी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्राचार्य मनोज बिडकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच प्रास्ताविकातून संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.
या कार्यक्रमास शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, शिंदे शिवसेना गटाचे नेते अमोल शिंदे, काँग्रेसचे प्रसिद्धीप्रमुख तिरुपती परकीपंडला, संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य दशरथ वडतिले, संस्थेचे कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजय भांगे आणि शुभम फसले यांनी सूत्रसंचालन केले, तर गटनिदेशक सिद्राम गोलेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी विद्यार्थ्यांसोबत छायाचित्रे काढून त्यांचा आनंद द्विगुणित केला. तसेच संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.







