कर्नाटक एक्स्प्रेसमधील धक्कादायक घटना; रेकॉर्डवरील महिला आरोपीला १० दिवसांची पोलीस कोठडी.
सोलापूर : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांशी ओळख वाढवून प्रसाद म्हणून गुंगीकारक पदार्थ मिसळलेली चिक्की खायला देत सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिलेला सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने एका दाम्पत्याला लक्ष्य करत तब्बल ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याचा प्रकार समोर आला आहे.
गीतादेवी ऊर्फ मीनादेवी रामनरेश थोर, वय ५७, रा. इटावा, उत्तर प्रदेश असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद व्यंकटेश कुमार हे आंध्र प्रदेशातील कर्नूल येथील रहिवासी असून, १५ सप्टेंबर २०२६ रोजी कोपरगाव ते मंत्रालय असा रेल्वे प्रवास करत असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. प्रवासादरम्यान आरोपी महिलेने दाम्पत्याला प्रसाद म्हणून गुंगीकारक औषध मिसळलेली चिक्की खायला दिली. चिक्की खाल्ल्यानंतर दोघांनाही गुंगी आली. याच संधीचा फायदा घेत महिलेने त्यांच्या जवळील ५० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले.
या प्रकरणी गोविंद कुमार यांनी सोलापूर लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी महिलेचा शोध सुरू केला. अखेर छत्रपती संभाजीनगर येथून या महिलेला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेवर छत्रपती संभाजीनगर, कल्याण लोहमार्ग, दादर लोहमार्ग आणि मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ती रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. १६ नोव्हेंबर रोजी सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शब्बीर तांबोळी करीत आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस निरीक्षक महेश भावी कट्टी यांनी दिली रेल्वे प्रवासात अनोळखी व्यक्तींनी दिलेले खाद्यपदार्थ स्वीकारताना प्रवाशांनी विशेष काळजी घेण्याची गरज






