ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या ऐतिहासिक नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात शुक्रवारी (दि. २०) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार विजय देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या समवेत झालेल्या या बैठकीत भागवत थिएटर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे नियोजन, सर्व्हिस रोड आणि पुलाच्या उतरणीच्या जागेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
#प्रस्तावित उड्डाणपूल इमारतींच्या अगदी जवळून जाणार असल्याने नंदीध्वज आणि भाविकांना प्रदक्षिणा मार्गावरून मार्गक्रमण करताना अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना किमान ५ ते ६ फुटांचा सर्व्हिस रोड उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याची ठाम भूमिका आमदार विजय देशमुख यांनी बैठकीत मांडली.
#या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (एनएचएआय) वरिष्ठ अधिकारी शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता प्रत्यक्ष प्रदक्षिणा मार्गाची संयुक्त पाहणी करणार आहेत. भूसंपादन आणि ऐतिहासिक वारसा वास्तूंसंदर्भातील नियमांचा विचार करून नंदीध्वज मिरवणुकीच्या पारंपरिक मार्गाला बाधा येणार नाही, अशा पद्धतीने नियोजन करण्याबाबत बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
#दरम्यान, महापौर निवास ते महात्मा गांधी पुतळा, जनरल पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन, शनि मंदिर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, जुना मिल, सुपर मार्केट, जैन मंदिर, मेकॅनिक चौक, भागवत थिएटर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, धरमती लाईन, नरवीर तानाजी चौक आणि ॲम्बेसेडर हॉटेल या मार्गासह पुढील मिरवणूक मार्गावरील प्रस्तावित कामांचे नकाशे आणि तांत्रिक बाबींचाही आढावा घेण्यात आला.
#या बैठकीस यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बु, योगिनाथ कुरले, गंगाधर कल्याणकर, नगरसेवक शिवानंद पाटील, अमर पूदाले, प्रवीण दर्गोपाटील, राजकुमार पाटील, गौतम कसबे, नगरसेविका स्वाती बडगू, मंडल अध्यक्ष दत्तात्रय बडगू, संजय कणके, ज्ञानेश्वर कारभारी, किरण पवार, विरेश उंबरजे, एनएचएआयचे प्रकल्प संचालक, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगररचना विभागाचे उपसंचालक व सहाय्यक संचालक तसेच भूसंपादन अधिकारी उपस्थित होते.







