कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेसाठी दर्शन रांगेतील माळकरी भाविकांमधून नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचगाव (खुर्द) येथील शेतकरी सुधाकर दशरथ शिंदे (वय ५८) आणि त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे (वय ५१) यांची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आली.
शिंदे दाम्पत्य गेल्या ११ वर्षांपासून नियमितपणे वारी करत असून, गेल्या २५ वर्षांपासून माळकरी आहे. शेती व्यवसाय सांभाळत त्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जपली आहे. श्री. सागर महाराज वाशिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे दाम्पत्य वारकरी संप्रदायाशी जोडले गेले आहे.
महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे दाम्पत्याचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती आणि वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाच्या वतीने वर्षभर मोफत प्रवासाचा पास प्रदान करण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या ‘दैनंदिनी २०२७’ चे प्रकाशन करण्यात आले.








