आमदार देवेंद्र कोठे : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर अतिक्रमणमुक्त करण्याची व्यक्त केली अपेक्षा
सोलापूर : प्रतिनिधी
वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोलापुरात होणाऱ्या लिंगायत भवनच्या पूर्ततेसाठी निधीची कमतरता भासणार नाही. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सहकार्य घेऊन लिंगायत भवनचे काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी आहे, असे अभिवचन आमदार देवेंद्र कोठे यांनी दिले.
वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे १२ वा राज्यस्तरीय वधू – वर परिचय मेळावा लिंगशेट्टी मंगल कार्यालयात झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून काशीपीठाचे जगद गुरू श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, जगद् गुरू श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, नागणसूर मठाचे श्री श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी, ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार बसवराज पाटील, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, स्थायी समिती सभापती आणि मेळाव्याच्या स्वागताध्यक्षा रंजिता चाकोते, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, माजी आमदार शिवशरण पाटील, डॉ. शैलेश पाटील, राजशेखर हिरेहब्बू, राजशेखर शिवदारे, राजशेखर विजापुरे, भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर, नगरसेवक अक्षय अंजिखाने, नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेवक रुद्रेश बोरामणी, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, केदार उंबरजे, सुधीर मळशेट्टी, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपस्थित होते.
आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, आपण ज्या गावात जन्मलो त्या गावच्या लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामदैवतासाठी काम करणे ही पहिली जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंग मंदिर जीर्णोद्धार आणि पुनर्विकासासाठी शासनाकडे ६ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. त्यातील दोन कोटी रुपये मंजूर झाले असून टेंडर प्रक्रिया झालेली आहे. श्री सिद्धरामेश्वर यात्रेदरम्यान मान्यवरांच्या उपस्थितीत या पुनर्विकासाच्या कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मोची, लोधी तसेच तेलगू समाजाच्या भवनासाठी निधी मंजूर केला आहे. शहर मध्य मतदारसंघात लिंगायत समाजाचा प्रस्ताव आल्यास या भवनासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्याची जबाबदारी माझी असेल, असे आश्वासनही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी दिले. विष्णुपंत नगर येथील मठास एक कोटी रुपयांचा निधी दिल्याचेही आमदार श्री. कोठे यांनी सांगितले.
——-
महेश कोठे, महापौर विनायक कोंड्याल आणि स्थायी समिती सभापती रंजिता चाकोतेंनी दिला निधी
लिंगायत भवनच्या उभारणीसाठी दिवंगत माजी महापौर महेश कोठे यांनी ७५ लाख रुपये, विद्यमान महापौर विनायक कोंड्याल यांनी ३० लाख रुपये तर स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांनी १२ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. लिंगायत भवन भव्य आकारामध्ये साकारणे आवश्यक आहे. त्याकरिता अतिरिक्त निधीसाठी मी व्यक्तिशः लोकप्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे प्रयत्न करणार आहे, असे आमदार श्री. कोठे म्हणाले.






