#नऊ वीटभट्टी चालकांना २१ लाख ६९ हजारांचा दंड; छावा संघटनेच्या तक्रारीनंतर तहसीलदार निलेश पाटील यांची कारवाई
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील नागरी वसाहतीमध्ये विनापरवाना वीटभट्ट्या चालविणाऱ्या नऊ वीटभट्टी चालकांवर महसूल विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत संबंधित वीटभट्टी चालकांना एकूण २१ लाख ६९ हजार २२५ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राष्ट्रीय छावा संघटनेने केलेल्या तक्रारीनंतर उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी ही कारवाई केली.
अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातील नागरी वसाहतीमध्ये अनेक अनधिकृत वीटभट्ट्या सुरू असून, तेथे मोठ्या प्रमाणात मातीचा साठा आणि लाखो विटा उपलब्ध असल्याची तक्रार राष्ट्रीय छावा संघटनेने केली होती. वीटभट्टी चालकांकडून मंजूर रॉयल्टीपेक्षा अधिक मातीचा साठा केला जात असल्याचा तसेच माती उत्खनन आणि वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्या घेतल्या नसल्याचा आरोप करण्यात आला होता.
याशिवाय, संबंधित वीटभट्टी चालकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतलेली नसून, विटांच्या वाहतुकीसाठीही आवश्यक परवाने नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. नागरी वसाहतीमध्ये सुरू असलेल्या या वीटभट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण होत असून, नागरिकांना त्वचा आणि डोळ्यांचे विकार उद्भवत असल्याने संबंधितांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.
राष्ट्रीय छावा संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पारवे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश मोरे आणि उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष रतिकांत पाटील यांनी उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी संबंधित ठिकाणी पंचनामा केला. यावेळी अनधिकृत मातीचा साठा, माती वाहतुकीचे परवाने, महसूल विभागाची परवानगी आणि रॉयल्टी भरल्याच्या पावत्या उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. तसेच मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झाल्याचेही पंचनाम्यातून स्पष्ट झाल्याने संबंधित नऊ वीटभट्टी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
दंड ठोठावण्यात आलेले वीटभट्टी चालक :
१. वीरेश आवटे – १ लाख ३३ हजार ७२५ रुपये
२. संतोष मोहरकर – १ लाख ६७ हजार २५ रुपये
३. अशोक होनमाने – १ लाख ३३ हजार ७२५ रुपये
४. बसवराज पाटील – ३ लाख ३३ हजार ५२५ रुपये
५. ओमकार दीक्षित – १ लाख ६७ हजार २५ रुपये
६. सुनील तंबाके – ६ लाख ६६ हजार ५२५ रुपये
७. चांद नदाफ – १ लाख ३३ हजार ७२५ रुपये
८. श्रीशैल कुंभार – २ लाख ६६ हजार ९२५ रुपये
९. परशुराम वाघमारे – १ लाख ६७ हजार २५ रुपये
अशा प्रकारे नऊ वीटभट्टी चालकांना एकूण २१ लाख ६९ हजार २२५ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नागरी वसाहतीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत वीटभट्ट्यांविरोधात महसूल विभागाने केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील वीटभट्टी चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.







