२४ नोव्हेंबरला भिमानगर येथे पुणे-सोलापूर महामार्ग बेमुदत रोखणार; राजू शेट्टी, महादेव जानकर यांचे शेतकऱ्यांना आंदोलनात उतरण्याचे आवाहन
#पंढरपूर : प्रतिनिधी
#ऊस दराच्या प्रश्नावर साखर कारखानदारांच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आज, १९ नोव्हेंबरपासून काटे बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तर येत्या २४ नोव्हेंबर रोजी भिमानगर (टेंभुर्णी) येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बेमुदत रोखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
#या आंदोलनात जिल्ह्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केले. पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित शेतकरी बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
#ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक आज (१९ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, कारखानदारांनी ही बैठक एक दिवस आधीच उरकून घेतल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील आणि रास्त मागण्यांसमोर भूमिका मांडणे कठीण जाईल, या भीतीने कारखानदारांनी हा निर्णय घेतल्याचा दावा संघटनांनी केला. कोणताही ठोस तोडगा न काढता शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप करण्यात आला.
#दरम्यान, राजू शेट्टी यांनी बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या आर्थिक गणिताची आकडेवारी मांडली. जिल्ह्यात एकूण ३९ साखर कारखाने असून, त्यापैकी १४ हून अधिक कारखान्यांची साखर उतारा क्षमता ११ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर ११ कारखान्यांचा साखर उतारा ९.७५ ते १०.७५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. या आकडेवारीच्या आधारे सर्व कारखान्यांना शेतकऱ्यांना प्रतिटन ३५०० रुपये पहिली उचल देणे सहज शक्य असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
#मात्र, सर्वपक्षीय साखर कारखानदारांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला. कारखानदारांच्या या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून काटे बंद आंदोलन सुरू करण्यात आले असून, २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महामार्ग रोको आंदोलनात ऊस उत्पादकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांनी केले आहे.








