श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांना विकल्या जाणाऱ्या पेढा आणि मिठाईच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने पेढा उत्पादक आणि मिठाई विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई करत तब्बल ८५० किलो मिठाईचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या साठ्याची किंमत २ लाख ५० हजार २० रुपये आहे. या कारवाईमुळे अक्कलकोटमधील मिठाई विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या सोलापूर झोन-१ पथकाने अक्कलकोट येथील मुख्य मिठाई पुरवठादार मे. रंगोली स्वीट मार्ट (मालक समीर बडेसाहब मकानदार) यांच्या आस्थापनेची तपासणी केली. यावेळी अस्वच्छ परिस्थितीत मिठाईची साठवणूक, लेबलविषयक नियमांचे उल्लंघन आणि अन्न सुरक्षा नियमांमधील त्रुटी आढळल्या. तसेच मिठाईचा दर्जा निर्धारित निकषांनुसार नसल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
या कारवाईत ३९८ किलो कंदी पेढा आणि ४३१ किलो स्वीट हलवा असा एकूण ८२९ किलो मिठाईचा साठा जप्त करण्यात आला. या पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, संबंधित मुख्य पुरवठादाराचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे.
मंदिर परिसरातील १२ दुकानांची तपासणी
१३ नोव्हेंबर रोजी श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील पेढा आणि प्रसाद विक्री करणाऱ्या १२ दुकानांची तपासणी करण्यात आली. यावेळी चार अनौपचारिक नमुने घेण्यात आले. तसेच २१ किलो स्वीट हलवा, अंदाजे ७ हजार ३५० रुपये किमतीचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.
यामध्ये सलीम मकानदार पेढा स्टॉल येथून ३ किलो, तर रंगोली स्वीट मार्ट येथून १८ किलो स्वीट हलवा जप्त करण्यात आला. याशिवाय लेमन पेढा आणि स्वीट हलव्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
चार दुकानांना व्यवसाय बंदचे आदेश
तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींमुळे समर्थ स्वीट स्टॉल, पाटील स्वीट शॉप, रंगोली स्वीट मार्ट (मंदिर परिसर) आणि सलीम मकानदार पेढा स्टॉल या चार आस्थापनांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच पिरजादे प्लॉट येथील मुख्य रंगोली स्वीट मार्टचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला असून, गुरुकृपा पूजा भंडार या आस्थापनेची नोंदणीही निलंबित करण्यात आली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई सहआयुक्त (अन्न) श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त एस. ई. देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी एखंडे आणि हिरेमठ यांच्या पथकाने केली.
अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी प्रशासनाकडून तपासणी मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनीही पेढा आणि मिठाई खरेदी करताना गुणवत्ता, उत्पादनाची तारीख आणि पॅकिंगवरील माहिती तपासावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





