आषाढी वारी 2026…..

जिल्ह्यात पालखी सोहळे, वारकरी येण्यापूर्वीच सर्व सुविधा पूर्ण कराव्यात

-जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

*मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही आषाढी वारी कालावधीत व्हीआयपी दर्शन बंद राहील तसेच नो व्हेक्कल झोन चे आदेशही काढले जाणार

*वारी कालावधीत भीमा नदीपत्रात चालणाऱ्या सर्व बोटीची तपासणी करावी, बोट चालकांची स्वतंत्र बैठक घ्यावी

*वारी कालावधीत तसेच इतर वेळीही पंढरपूर शहरातील ऑटो चालकांनी कोणत्याही भाविकांकडून जास्तीचे भाडे घेऊन त्रास देऊ नये याची दक्षता आरटीओ नी घ्यावी

सोलापूर दिनांक 23:- आषाढी शुद्ध एकादशी सोहळा शनिवार दिनांक 25 जुलै 2026 रोजी होणार आहे. त्यानिमित्त पालखी सोहळे समवेत तसेच श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांसाठी प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व सोयी सुविधा तत्पूर्वीच पूर्ण करून घेण्याची जबाबदारी सर्व संबंधित विभाग प्रमुखाची राहील. तसेच सर्वसामान्य भाविकांचे दर्शन सुलभ व कमी वेळेत होण्यासाठी मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही व्हीआयपी दर्शन बंदच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिली.

आषाढी वारी 2026 पूर्व तयारी बैठकीत जिल्हाधिकारी कार्तीकेयन मार्गदर्शन करत होते.

यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, पोलिस उप विभागीय अधिकारी प्रशांत डगळे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सह आयुक्त नगरपालिका आशिष लोकरे, अन्य धान्य पुरवठा अधिकारी ओंकार पडोळे, वीज वितरण चे अधीक्षक अभियंता सुनील माने, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत सूर्यकांत भुजबळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्या सह पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील सर्व संबंधित अधिकारी ऑनलाइन द्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्तीकेयन म्हणाले की, जिल्ह्यात पालखी सोहळे दाखल होण्यापूर्वी पालखी मार्ग व पालखी तळावर वारकरी भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध ठेवाव्यात. सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखी तळाचे मुरमीकरण करण्याबाबत आवश्यक ती तात्काळ कार्यवाही करावी. पालखी तळावरील स्वच्छता, काटेरी झुडपे काढणे, शौचालय दुरुस्ती, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, जंतनाशक फवारणी, हायमास्ट, स्नानगृह, हिरकणी कक्ष आदी सुविधा बाबत संबंधित नगरपालीकेनी कार्यवाही करावी नातेपुते येथील वाढीव पालखी तळाबाबत संबंधित जागा मालकाशी चर्चा करावी व वाढीव पालखीतळाबाबत जागा उपलब्ध करून घ्यावी. यात्रा कालावधीत पालखी तळांवर सुलभ शौचालयाकडून वारकरी भाविकांकडून पैसे घेत असल्याची तक्रारी येत आहेत त्याबाबत दक्षता घेऊन संबंधितांना तात्काळ सूचना देण्यात याव्यात, असेही त्यांनी निर्देशित केले.

तोंडले-बोंडले येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सुरक्षितरित्या जाण्यासाठी पालखी सोहळा प्रमुखांशी चर्चा करून सुरक्षित मार्गाची व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने करावी. पालखी महामार्गावरून पिराच्या कुरोली येथील पालखी तळाकडे जाणाऱ्या रस्तादुरुस्तीचे काम तात्काळ करावे. तसेच भंडीशेगाव येथे सोपान काका पालखी तळासाठी पाटबंधारे विभागाची जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या पाटबंधारे विभागाच्या वापरत नसलेल्या व पाडण्यासाठी परवानगी मिळालेल्या तीन इमारती तात्काळ पाडून सपाटीकरण व मुरमीकरण करावे, पालखी कट्टा तयार करावा, हायमास्ट दिवे आदी व्यवस्थेबाबत तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी दिल्या.

वाखरी व कॉलेज चौक ते सरगम चौक येथील पुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ पूर्ण करावे. तसेच साईड पट्टीचे काम व रस्त्याच्या कडेला पडलेला राडारोडा काढून स्वच्छता करावी. पोलीस प्रशासनाने वॉचटावर साठी प्रस्ताव सादर करावा. 65 एकर (भक्ती सागर) येथे वारकरी भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालय, हायमास्ट ,मुरमीकरण, सुशोभीकरण, सीसीटीव्ही सुविधा तसेच माहिती फलक, पार्किंग नगरपालिका प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी दिल्या.

चंद्रभागा नदी पात्रात होडी चालकांना तसेच जलप्रवासी यांना लाइफ जॅकेटची उपलब्धता करावी. नदीपात्रात रेस्क्यू वाहन, सुरक्षा रक्षक नेमावेत, आसन क्षमतेपेक्षा जास्त जलप्रवासी वाहतूक करू नये. सूर्यास्तानंतर जलप्रवास वाहतूक बंद ठेवावी. तसेच त्या ठिकाणी पाटबंधारे, पोलीस व नगरपालिका विभागांच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. पिण्याच्या पाण्याचे टँकर भरण्याची ठिकाणे निश्चित करावेत टँकर भरण्यासाठी जाणारे रस्ते सुस्थितीत असावी याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाने तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी तसेच मुबलक औषध साठा उपलब्ध ठेवावा.तसेच पाणी स्तोत्राची तपासणी करून घ्यावी, असे ही श्री. कार्तीकेयन यांनी सुचित केले.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी म्हणाले की यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चंद्रभागा स्नानासाठी जातात चंद्रभागा नदीवरील घाटांना मजबूत बॅरिकेटिंग करावे तसेच काही घाटांचे दगड सैल झालेले असल्यामुळे त्याची दुरुस्ती तात्काळ करावे. सीसीटीव्हीची संख्या वाढवावी. वाखरी पालखी तळावर कायमस्वरूपी वॉचटॉवर तयार करावा. पोलीस विभागाच्या वतीने एकूण 33 वाचतावर उभारले जाणार आहेत असेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जिल्हा परिषदेला यात्रा कालावधीत पालखी सोहळे वारकरी भाविक यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 61.50 कोटीचा निधी उपलब्ध झालेला असून त्या अनुषंगाने 23 ठिकाणी जर्मन हंगर उभारणी केली जाणार असून चरण सेवा उपक्रम, 500 महिला स्नानगृह, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी जोड रस्ते, मुरमीकरण, हिरकणी कक्ष, 15 मोबाईल चार्जिंग व्हॅन, तीनशे मोबाईल आरोग्य दूत, पाणी टँकरची व्यवस्था, 5 हजार मोबाईल टॉयलेटची व्यवस्था, तसेच 10 हजार वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने पंढरपूर शहरात तसेच 65 एकर परिसरात उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची माहिती दिली तर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर, मंदिर परिसर तसेच वाळवंटात मंदिर समितीच्या वतीने भाविकांसाठी सुलभ व जलद दर्शन व्यवस्था तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात येत असलेल्याबातची माहिती दिली.

आषाढी वारी 2026.....
जिल्ह्यात पालखी सोहळे, वारकरी येण्यापूर्वीच सर्व सुविधा पूर्ण कराव्यात
      -जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *