पारायणात ८ वर्षाचा बालक तर ८८ वर्षाच्या आजीचा सहभाग.
सिद्धेश्वर फाउंडेशनने ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करून सोलापुरात आळंदी साकारली आहे. या पारायण सोहळ्याने संपूर्ण सोलापूर ज्ञानेश्वरमय झाल्याचे दिसते तसेच ज्ञानोबा तुकोबा हे जगाला तारणारी असून विश्वशांती मिळवून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी होय. असे गौरवोद्गार ज्ञानेश्वर माउली संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ महाराज यांनी काढले. सिद्धेश्वर फाउंडेशन आयोजित जुळे सोलापूर येथील जामगुंडी लॉन्स येथे सुरू झालेल्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
सिद्धेश्वर फाउंडेशन सोलापूरच्या वतीने जामगुंडी लॉन्स येथे ५ जून ते १२ जून २०२६ या कालावधीत ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक मास पुण्यपर्वानिमित्त तसेच श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्यासपीठावर अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.श्री. सुधाकर इंगळे महाराज, ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व ह. भ.प. काशीनाथ सर्जे, राघवेंद्र जामगुंडी, श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सर्जे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना ह. भ. प. सुधाकर इंगळे महाराज म्हणाले, अधिक महिन्यात पारायण करणे म्हणजे अधिक भाग्य लाभते. सोलापूरकरांनी १९९६ मध्ये वर्षभर पारायण केले. ज्ञानेश्वरांची ७०० सातवी जयंती साजरा करण्याचा मानवी सोलापूरकरांनी मिळवला आहे.
प्रारंभी श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे मार्गदर्शक विष्णुदास (सतीश) मालू यांनी स्वागत केले. या पारायण सोहळ्याचे संकल्पक डॉ. अनिल सर्जे यांनी प्रास्ताविकेतून ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमाची संकल्पना मांडली. सोलापूरकरांमध्ये अधिक मासात पुण्य कर्म घडावे तसेच सोलापूरकरांना आध्यात्मिक ओढ निर्माण व्हावी या उद्देशाने पारायण सोहळ्याचे आयोजन केल्याचे सांगितले.
प्रारंभी सोहळ्याचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने झाला. दिलीप पोतदार दांपत्याने संकल्प पूजा केली. यावेळी सौ. सीमाताई खोडके यांनी व्यासपीठ पूजन केले तदनंतर श्री योगी निरंजननाथ महाराज यांच्या हस्ते ग्रंथ पूजन पार पडले तर वीणा पूजन नामदेव महाराज पुकळे यांच्या हस्ते संपन्न झाले. पखवाज पूजन तुकाराम (बापू) राऊत यांनी तर टाळ पूजन गुरुलिंग काका कन्नूरकर यांच्या हस्ते पार पडले. ध्वजपूजन ह. भ. प. सदाशिव महाराज चौरे, सचिन गायकवाड, भानुदास इरशेट्टी यांनी केले. यावेळी स्वरब्रह्म बाल भजनी मंडळाच्या गायकांनी पंचपदी सादर केली.
उद्घाटन सोहळ्यानंतर ७५० भाविकांनी महाराजां समवेत एक सुरात ज्ञानेश्वरी पारायणाच्या ओवींचे पठण केले. सोलापुरात इतका मोठा सोहळा प्रथमच होत असल्याने भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. दररोज २ ते ७ या वेळेत चालणाऱ्या या पारायणात सर्व भक्तांना अल्पोपाहार देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात ७५० भाविक असले तरी आठ वर्षाच्या चन्नवीर नागणसुरे या बालकाने पारायणात सहभाग घेऊन सर्वांचे लक्ष वेधले. तर ८८ वर्षाच्या रुक्मिणीदेवी बद्रीनारायण मालू या माऊलींनी उपस्थिती लावून तरुणांसमोर आदर्श निर्माण केल्याचे चित्र बघायला मिळाले.सर्व भगिनींनी गुलाबी रंगाच्या साड्या परिधान करुन पारायण कार्यक्रमात आगळावेगळा उत्साह निर्माण केला.सर्व भक्तांसाठी सौ. सीमाताई खोडके यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ स्वखर्चाने उपलब्ध करून दिला.जामगुंडी लॉन्सचे मालक राघवेंद्र जामगुंडी यांनी आठ दिवस लॉन्स दिले असून काल्याच्या कीर्तनानंतरची महाप्रसाद सेवा त्यांनीच घेतली आहे.
लोकसहभागातून संपन्न होत असलेल्या या पारायण सोहळ्यात सोलापूरकरांनी तन मन धनाने उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने योगी निरंजननाथ यांच्या अमृत हस्ते नारळाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सिद्धेश्वर फाउंडेशनचे संपर्कप्रमुख राजेंद्र बलसुरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वनाथ आमणे, गंगाधर पाटील, काशीनाथ पटणे, राजाराम दसगोंडे नामदेव पुकळे, तुकाराम राऊत, चंद्रकांत फुलमाळी, ईरण्णा अतनुरे, भीमसिंग राजपूत, दिपक बच्चुवार सुनील कापसे, पांडुरंग अग्नीकर, चंद्रकांत फूलमाळी,डॉ.गौरी सर्जे यांनी विशेष परिश्रम घेतले.
गुरुलिंग कन्नुरकर म्हणाले, अपेक्षा ७५० पण प्रत्यक्षात ७७० उपस्थित…या पारायण सोहळ्यास पारायण करण्यासाठी ७५० भक्त यावेत अशी अपेक्षा होती.पण सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद देत ७७० भक्तांनी सहभाग घेऊन संयोजकांचा उत्साह वाढविला आहे
