सोलापूर, दि. १ जून : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ऐतिहासिक स्मृती जपण्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे दरवर्षी दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा केला जातो. यंदाही हा भव्य सोहळा ५ व ६ जून रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक व पारंपरिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक तथा छत्रपती शिवराय आणि राजर्षी शाहू महाराज यांचे वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडणार असून, यावर्षी देशभरातून सुमारे ५ ते ७ लाख शिवभक्त, इतिहास संशोधक, अभ्यासक, इतिहासप्रेमी व पर्यटक रायगडावर उपस्थित राहण्याची शक्यता असल्याची माहिती महोत्सव समितीचे सदस्य संतोष जाधव यांनी माहिती दिली.
यंदा सोलापूर जिल्ह्यातूनही सुमारे 250 स्वयंसेवक व 2.5 हजार शिवप्रेमी रायगडावर जाणार असून, जिल्ह्यातील विविध भागांतून शिवभक्तांच्या वाहनांचे ताफे रायगडकडे रवाना होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
शिवभक्तांना सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समितीतर्फे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. ५ व ६ जून रोजी विविध सांस्कृतिक, ऐतिहासिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सोहळ्याची सुरुवात पहाटे रायगडावरील नगारखान्यासमोर भगवा ध्वज उभारून करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडेल. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर सुवर्णनाण्यांचा अभिषेक करण्यात येणार आहे.
रणवाद्य, हलगी, घुमके व कैताळाच्या गजरात होळीच्या माळावर शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. तसेच भव्य पालखी सोहळा, छत्र-चामरासह शिवछत्रपतींच्या प्रतिमेची शोभायात्रा आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणारे शिवभक्त हे सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत.
युवराज छत्रपती संभाजीराजे शिवभक्तांना मार्गदर्शन करणार असून महिला व पुरुष ढोल-ताशा पथकांचाही दमदार सहभाग राहणार आहे. पूर्णा येथील रणवाद्य ढोल-ताशा पथक, शंभूगर्जना ढोल-ताशा पथक तसेच कोल्हापूर येथील नाद ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार असल्याचे संतोष जाधव यांनी सांगितले.