सोलापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोडनिंब गावाजवळील सोलंकरवाडी फाट्यावर शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. भरधाव इनोव्हा कारने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार अर्जुन तुकाराम वाघमारे (वय ५७, रा. अरण, ता. माढा, जि. सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, इनोव्हा कार (क्र. एमएच १४ एफएक्स २४५८) सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जात होती. याचवेळी मोडनिंब येथून अरणकडे दुचाकीवरून (क्र. एमएच १३ बीके ८२०६) निघालेल्या वाघमारे यांच्या दुचाकीला सोलंकरवाडी फाट्याजवळ कारने समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत गंभीर मार लागल्याने वाघमारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल नाक्यावरील गस्ती पथक आणि मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरवडे टोल नाक्याच्या रुग्णवाहिकेतून डॉ. अक्षय लोखंडे आणि चालक नागनाथ भालेराव यांनी मृतदेह मोडनिंब येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला.
यावेळी वरवडे टोल नाक्याचे गस्ती पथक प्रमुख संतोष खडके, सहाय्यक स्वप्नील शिंदे, चालक बंडू गायकवाड तसेच मोडनिंब महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी किरण औताडे (पीएसआय), अत्तार (हेड कॉन्स्टेबल), मुलानी (हेड कॉन्स्टेबल), सरडे (पोलीस कॉन्स्टेबल) आणि माने (पोलीस नाईक) यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
या अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या अपघात विभागाचे अधिकारी जगताप यांना देण्यात आली असल्याची माहिती वरवडे टोल नाक्याचे गस्ती पथक प्रमुख संतोष खडके यांनी दिली.




