नालेसफाईतील गैरव्यवहार प्रकरण विधानसभेत गाजणार.!

महापालिका प्रशासनाने शासनाला कळवली माहिती

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या सन २०२५-२६ मधील पावसाळापूर्व नालेसफाई कामातील कथित गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट विधानसभेत पोहोचले आहे. नालेसफाईच्या कामात बोगस नोंदी करून लाखोंची बिले काढण्याचा प्रयत्न, अंदाजपत्रकीय दरापेक्षा ४० टक्के अधिक दराने काम देणे आणि दोषी अधिकाऱ्यांवरील कारवाई प्रलंबित ठेवणे, या मुद्द्यांवर आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या प्रकरणात १९ अधिकाऱ्यांवर ठपका ठेवून अंतिम नोटिसा बजावल्याची माहिती महापालिका प्रशासनाने शासनाला दिली आहे.

महापालिकेच्या नालेसफाई कंत्राटातील कथित अनियमिततेबाबत भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी तक्रार दाखल करून सातत्याने पाठपुरावा केला होता. सभागृहातही त्यांनी हा मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारावर कारवाईची मागणी केली होती. आता हा विषय विधानसभेपर्यंत पोहोचल्याने प्रकरणाला राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले आहे.

शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक ४५१९२ उपस्थित केला आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रश्नाला आमदार सुभाष देशमुख आणि हरीश पिंपळे यांनी पाठिंबा दिला आहे. तर आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्रश्नाला आमदार प्रवीण दटके यांनी समर्थन दिले आहे. या प्रश्नांच्या अनुषंगाने शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिका प्रशासनाकडून संपूर्ण प्रकरणाची माहिती मागवली होती. त्यानुसार प्रशासनाने सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती नगरसेवक अनंत जाधव यांनी दिली.

या प्रकरणातील सर्वाधिक गंभीर मुद्दा म्हणजे जेसीबी मशीन बंद असतानाही तिच्या कामाच्या तासांची नोंद करून बिले आकारण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार. प्रत्यक्षात मशीन बंद असताना १६ ते ९७ तासांपर्यंत काम केल्याच्या नोंदी करण्यात आल्याचा आरोप आहे. जुना तुळजापूर नाका परिसरात ११ एप्रिल २०२६ रोजी जेसीबी मशीन दीर्घकाळ बंद असतानाही काम सुरू असल्याचे दाखवून प्रतितास ४ हजार ८०० रुपये दराने बिल काढण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण लोकप्रतिनिधींनी सादर केल्याचाही उल्लेख विधानसभा प्रश्नात करण्यात आला आहे. प्रशासनाने आपल्या उत्तरात या तक्रारीतील मुद्दा मान्य केल्याचे नमूद केले आहे.

याशिवाय शहरातील विविध विभागीय कार्यालयांच्या हद्दीत नालेसफाई तसेच आदिला नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणासाठी पोकलेन मशीनच्या कामातही अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अंदाजपत्रकीय दरापेक्षा तब्बल ४० टक्के अधिक दराने कंत्राट देण्यात आल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे.या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी सुरू असून, प्राथमिक चौकशीत १९ अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. संबंधितांना अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरी चौकशीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अंतिम कारवाई झालेली नाही, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दोषी अधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराविरुद्ध स्वतंत्र चौकशी करून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी, तसेच त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्याबाबत काय पावले उचलली, अशी विचारणाही विधानसभा प्रश्नातून करण्यात आली आहे.अतिरिक्त आयुक्तांच्या चौकशी अहवालात गैरव्यवहार स्पष्ट झाल्यानंतरही संबंधितांवर निलंबन किंवा गुन्हे दाखल न करता पुन्हा विभागीय चौकशी लावून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला आहे काय? दोषी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर ठेवून अभय देणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची शासनाने चौकशी केली आहे काय? तसेच दोषी अधिकारी व कंत्राटदारावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करणे, प्रलंबित देयके रोखणे आणि बेकायदेशीर मालमत्ता जप्त करण्याबाबत काय कारवाई केली आहे? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

नालेसफाईसारख्या मूलभूत नागरी सुविधेच्या कामात अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर आता शासनस्तरावरही या प्रकरणाची माहिती पोहोचली आहे. १९ अधिकाऱ्यांना नोटिसा बजावूनही अंतिम कारवाई का झाली नाही, संबंधित कंत्राटदारावर काय कारवाई होणार आणि कथित आर्थिक गैरव्यवहाराची वसुली होणार का, हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

दोषी अधिकारी , एजन्सीची

लवकरच पोलखोल होईल : अनंत जाधव

नालेसफाईतील कथित गैरव्यवहाराचा नगरसेवक अनंत जाधव यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. याबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, नालेसफाईच्या कामात अनियमितता करणारे अधिकारी आणि संबंधित एजन्सी यांची लवकरच पोलखोल होईल. या प्रकरणातील दोषींना वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही जाब द्यावा लागेल. संबंधितांवर कठोर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार आहे,असे जाधव यांनी सांगितले.

  • Related Posts

    पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; 94 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

    रेल्वेची जागा नगरपालिकेकडे; संत नामदेव महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित स्मारक उभारण्यात येणार पंढरपूर : विठ्ठलनगरी पंढरपूर येथे संत शिरोमणी नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याच्या प्रकल्पाला महाराष्ट्र राज्याच्या उच्चाधिकार समितीने मान्यता दिली…

    माजी आमदार कॉ. आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली रिक्षा संघटना एकवटल्या; बाईक टॅक्सी बंदीसाठीयेत्या १ डिसेंबरला पुकारला बंद..!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; 94 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

    पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारणार; 94 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

    माजी आमदार कॉ. आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली रिक्षा संघटना एकवटल्या; बाईक टॅक्सी बंदीसाठीयेत्या १ डिसेंबरला पुकारला बंद..!

    नालेसफाईतील गैरव्यवहार प्रकरण विधानसभेत गाजणार.!

    अस्सल सोलापुरी politics : #माजी आमदार भाजपा नेते दिलीप माने,काँग्रेसचे चेतन नरोटे,शिवसेनेचे अमोल शिंदे यांच्यासह कार्यकर्ते,मतदार

    अस्सल सोलापुरी politics : #माजी आमदार भाजपा नेते दिलीप माने,काँग्रेसचे चेतन नरोटे,शिवसेनेचे अमोल शिंदे यांच्यासह कार्यकर्ते,मतदार

    DCC बँकेच्या मतदानाला चढतोय जोर

    DCC बँकेच्या मतदानाला चढतोय जोर

    DCC इलेक्शन मतदान प्रकिया जोरात…

    DCC इलेक्शन मतदान प्रकिया जोरात…