व्हिएतनाममधील फु-कॉक येथे पार पडली स्पर्धा; सोलापुरातील चार वेळा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे पहिले स्पर्धक
सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर सोलापूरचे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अभिजित वाघचवरे यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर सोलापूरचा झेंडा उंचावला आहे. व्हिएतनाममधील फु-कॉक बेटावर पार पडलेली प्रतिष्ठेची आयर्नमॅन स्पर्धा त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली. विशेष म्हणजे, चौथ्यांदा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे ते सोलापूरमधील पहिले स्पर्धक ठरले आहेत.
स्विमिंग, सायकलिंग आणि धावणे अशा तीन कठीण टप्प्यांचा समावेश असलेली ही स्पर्धा जगभरातील सुमारे ८०० स्पर्धकांच्या सहभागात पार पडली.
रविवारी पहाटे थंड वातावरणात दक्षिण चीन समुद्रात २ किलोमीटर पोहण्याचा टप्पा पूर्ण केल्यानंतर डॉ. वाघचवरे यांनी समुद्रकिनाऱ्यालगतच्या चढ-उतार असलेल्या रस्त्यावर ९० किलोमीटर सायकलिंग अवघ्या ३ तास १० मिनिटांत पूर्ण केले. त्यानंतर कडक ऊन आणि वाऱ्याचा सामना करत २१ किलोमीटर धावण्याचे आव्हान ७ तास १८ मिनिटांत पूर्ण केले. अशा प्रकारे तिन्ही टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण करत त्यांनी आयर्नमॅनचे पदक पटकावले आणि भारतीय तिरंगा अभिमानाने फडकावला.
डॉ. वाघचवरे यांचा आयर्नमॅन स्पर्धेतील हा चौथा विजय आहे. यापूर्वी २०१९ मध्ये गोवा, २०२४ मध्ये इटली येथे फुल आयर्नमॅन, तर २०२६ च्या सुरुवातीला ओमान येथे त्यांनी ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली होती. त्यानंतर आता नोव्हेंबर २०२६ मध्ये व्हिएतनाममध्ये चौथ्यांदा ही कामगिरी करत त्यांनी आपल्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला.
डॉ. अभिजित वाघचवरे यांनी यापूर्वीही अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून, आपल्या कामगिरीतून अनेकांना व्यायाम आणि तंदुरुस्तीचा संदेश दिला आहे. या कठीण प्रवासात कुटुंबीयांची साथही त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली. त्यांच्या पत्नी डॉ. राजश्री वाघचवरे यादेखील मॅरेथॉन धावपटू आणि सायकलिस्ट आहेत. त्यांचे बंधू दंतरोगतज्ज्ञ डॉ. सत्यजित वाघचवरे हेदेखील मॅरेथॉन धावपटू आणि सायकलिस्ट आहेत.
नियमित व्यायाम आणि शिस्तबद्ध सरावाच्या माध्यमातून अशा कठीण स्पर्धा पूर्ण करता येतात. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सहकारी, मित्रपरिवार आणि वाघचवरे कुटुंबीयांकडून नेहमीच प्रेरणा व सहकार्य मिळते, अशी भावना डॉ. अभिजित वाघचवरे यांनी व्यक्त केली.
त्यांच्या या यशामुळे सोलापूरच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे









