“दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि आपुलकीच्या नात्यांचा सण. मात्र, आपल्या कुटुंबापासून, गावापासून आणि नातेवाईकांपासून शेकडो किलोमीटर दूर राहून ऊसाच्या फडात कष्ट करणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद अनेकदा हरवलेला असतो. आपल्या मुलाबाळांसह पालात राहून उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या या कष्टकरी कुटुंबांच्या आयुष्यातही दिवाळीचा प्रकाश फुलावा, त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमलावे आणि शासन आपल्या पाठीशी आहे, याची त्यांना जाणीव व्हावी, या भावनेतून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी (दि. ९ नोव्हेंबर) पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली.”
सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पालकमंत्री गोरे यांचे सोनके येथील ऊसतोड कामगारांच्या पालावर आगमन झाले. आपल्या पालावर राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाळी साजरी करण्यासाठी येणार असल्याचे समजल्यापासूनच कामगार कुटुंबीयांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण होते. सकाळपासूनच लहान मुले, महिला आणि कामगार या आगळ्यावेगळ्या दिवाळीच्या स्वागतासाठी उत्साहाने तयारी करत होते. गावापासून शेकडो किलोमीटर दूर, अनोळखी ठिकाणी कष्टाचे जीवन जगणाऱ्या या कुटुंबांसाठी शासनातील एका महत्त्वाच्या व्यक्तीने थेट आपल्या पालावर येऊन दिवाळी साजरी करणे ही निश्चितच भावनिक आणि सुखद अनुभूती होती.
पालकमंत्री गोरे यांचे आगमन होताच कामगार महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने त्यांनी महिला ऊसतोड कामगारांना भाऊबीज दिली. तसेच कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिवाळीचा फराळ व लहान मुलांसह सर्वांसाठी नवीन कपडे आणले होते. यावेळी त्यांनी कामगार कुटुंबीयांसोबत फराळाचा आस्वाद घेतला. लहान मुलांना प्रेमाने फराळ भरवला, तर मुलांना आणलेले नवीन कपडेही स्वतःच्या हाताने परिधान केले. मंत्री म्हणून नव्हे, तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून त्यांनी या सर्वांशी संवाद साधत दिवाळीचा आनंद द्विगुणित केला.
मुलांच्या शिक्षणाची आस्थेने विचारपूस
या भेटीतील विशेष लक्षवेधी क्षण म्हणजे पालकमंत्री गोरे यांनी ऊसतोड कामगारांच्या लहान मुलांशी साधलेला संवाद. या मुलांच्या शिक्षणाची स्थिती, शाळेत जाण्याची व्यवस्था, अभ्यास आणि त्यांना येणाऱ्या अडचणी याबाबत त्यांनी आस्थेने विचारपूस केली. ऊसतोड कामगारांच्या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची जाणीव ठेवून त्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी चर्चा करून या मुलांसाठी जवळच्या जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था करण्याबाबत अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळीच्या भेटवस्तूंबरोबरच शिक्षणाच्या माध्यमातून मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा हा प्रयत्न या भेटीचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.
या ठिकाणी मराठवाडा, विदर्भ तसेच नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातून आलेले सुमारे ४० ते ५० ऊसतोड कामगार आपल्या कुटुंबीयांसह पालावर वास्तव्यास आहेत. पालकमंत्री गोरे यांनी प्रत्येकाशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या, कुटुंबाची परिस्थिती, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा याबाबत त्यांनी विचारपूस केली. आपल्या घरापासून दूर राहून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कष्ट करणाऱ्या या कामगारांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास त्यांनी दिला.
यावेळी पालावर आकाशकंदील लावून दिवाळीचा प्रकाश पसरविण्यात आला. या आकाशकंदिलाच्या प्रकाशाप्रमाणेच या कष्टकरी कुटुंबांच्या जीवनातही आनंद, समाधान आणि प्रगतीचा प्रकाश निर्माण व्हावा, यासाठी शासन कटिबद्ध असल्याची भावना पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.
मंत्री नव्हे, कुटुंबातील सदस्य बनून साजरी केली दिवाळी!
सामान्यतः दिवाळीचा सण प्रत्येकजण आपल्या घरात, आपल्या माणसांसोबत साजरा करतो. मात्र, आपल्या घरापासून दूर राहणाऱ्या या ऊसतोड कामगारांच्या पालावर जाऊन त्यांच्या आनंदात सहभागी होणे, त्यांच्या मुलांना प्रेमाने जवळ घेणे, फराळ भरवणे, महिलांना भाऊबीज देणे आणि त्यांच्या समस्या जाणून घेणे, या कृतींमधून पालकमंत्र्यांनी केवळ सण साजरा केला नाही, तर माणुसकीच्या नात्यालाही उजाळा दिला.
या भेटीदरम्यान कामगारांच्या पालावर आनंद, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. शासनाकडून मिळालेल्या या प्रेमाच्या भेटीने कामगार कुटुंबीय भारावून गेले होते. आपल्या दुःखाची, कष्टांची आणि अडचणींची दखल घेणारे कोणीतरी आपल्यासोबत आहे, ही भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती. अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद तरळत होता, तर काहींचे डोळे या अनपेक्षित आपुलकीने पाणावले होते.
दिवाळीच्या निमित्ताने सोनके येथील ऊसतोड कामगारांच्या पालावर केवळ दिव्यांची रोषणाई झाली नाही, तर आपुलकी, माणुसकी आणि शासनाच्या संवेदनशीलतेचा एक वेगळाच प्रकाश उजळला. घरापासून दूर असलेल्या या कष्टकरी कुटुंबांसाठी ही दिवाळी केवळ सण नव्हती, तर शासन आपल्या सुख-दुःखात सहभागी आहे, याची जाणीव करून देणारा अविस्मरणीय अनुभव ठरली.
दिवाळीच्या फराळातील गोडवा, भाऊबीजेतील मायेचा ओलावा आणि चिमुकल्यांच्या शिक्षणाची घेतलेली जबाबदारी… सोनके येथील ऊसतोड कामगारांच्या पालावर साजरी झालेली ही दिवाळी माणुसकीच्या नात्याचा खरा प्रकाश दाखवून गेली! तर अशा कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीमध्ये शासन सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार यांच्या समवेत असल्याचा विश्वासही दिला.
“पालकमंत्री व शासनाचे आभार! आमच्या ऊसतोड कामगारांच्या पालावर शासन येऊन आमची दिवाळी गोड केली. शासनाने आम्हाला कपडे, चिवडा, साबण असे सर्व काही दिले. पहिल्यांदाच आमची अशी दिवाळी साजरी झाली, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला.”

