#झाडावरील लिंबू सहज काढता येणार; हाताला इजा होण्याचा धोका कमी होणार**
#राहुरी :
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या मनुष्यचलित लिंबू काढणी उपकरणाला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून पेटंट प्रदान करण्यात आले आहे. या संशोधनामुळे लिंबू काढणीची प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि कार्यक्षम होणार असून, पारंपरिक पद्धतीने लिंबू तोडताना होणारा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
#भारतीय कृषी संशोधन परिषदेंतर्गत कार्यरत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पातील शास्त्रज्ञांनी हे उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाला ५४ व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून, त्याचा प्रसार करण्यासाठीही पुढाकार घेण्यात आला आहे.
#झाडावरील लिंबू सहजपणे काढता यावेत आणि काढणी करताना हाताला इजा होण्याची शक्यता कमी व्हावी, या उद्देशाने या उपकरणाची रचना करण्यात आली आहे. उपकरणाच्या लिंबू गोळा करण्याच्या भागाला कापडी पिशवी जोडण्यात आली आहे. त्यामुळे झाडावरून तोडलेली लिंबू थेट या पिशवीत जमा होतात. परिणामी लिंबू काढणीचे काम अधिक सोपे आणि कार्यक्षम होते.
#या उपकरणामुळे झाडावरील लिंबू सहजपणे काढता येणार असून, हाताला इजा होण्याचा धोका कमी होणार आहे. तसेच तोडलेली लिंबू कापडी पिशवीत सुरक्षितपणे जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना काढणीच्या कामात मोठा दिलासा मिळणार आहे.
#या संशोधनात प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. रवीकिरण राठोड, डॉ. अण्णासाहेब शिंदे, शासकीय कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सचिन नलवडे, प्रकल्पप्रमुख डॉ. तुकाराम बास्टेवाड, अजिंक्य गुंजाळ, ओंकार सोनवणे आणि तानाजी झोरे यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
#पेटंट मिळविण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खबरे आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांचे मार्गदर्शन लाभले. संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, शिक्षण संचालक डॉ. सातप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरख ससाणे आणि अधिष्ठाता डॉ. सचिन नलवडे यांनी पेटंट मिळविण्यात सहभागी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.






