हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सायंकाळी ५ वाजता कार्यक्रम; सर्वांसाठी मोफत प्रवेश
सोलापूर (प्रतिनिधी) : मनःशांती, सकारात्मक विचार आणि तणावमुक्त जीवनाचा मार्ग दाखविण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, सोलापूर यांच्या वतीने गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी वक्त्या बी.के. शिवानी दीदी यांच्या विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सरल मन, सरल जीवन’ या विषयावर त्या मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ५ वाजता हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक ताण, अस्वस्थता आणि नातेसंबंधांमधील गुंतागुंत वाढत असताना आनंदी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी आध्यात्मिक मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे. हीच गरज ओळखून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रवचनातून संतुलित व आनंदी जीवन, मनःशांती, तणावमुक्त जीवनशैली, सकारात्मक विचार, भावनिक बुद्धिमत्ता, स्व-व्यवस्थापन, नातेसंबंधांतील सुसंवाद, कर्मसिद्धांत, आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि आत्मपरिवर्तन अशा विविध विषयांवर बी.के. शिवानी दीदी मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी www.omshanti.in/solapur या संकेतस्थळावर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, नोंदणी झाली नसली तरी सर्वांसाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असल्याने उपस्थितांनी वेळेत पोहोचावे, असे आयोजकांनी कळविले आहे.
अधिक माहितीसाठी ८६६९१६३३७२ किंवा ७७७४९९८८७७ या क्रमांकांवर संपर्क साधावा. सोलापूरकरांनी या प्रेरणादायी प्रवचनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे






